ही वेबसाईट कै. श्री. गणपत सिताराम मांढरे उर्फ भाऊ यांच्या परिकल्पनेतून साकार झाली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरंतन शांती देवो.
- समस्त ग्रामस्थ, मांढरदेवी.
विशेष आभार :- या वेबसाईट मधील माहिती डॉ. जगदीश लांजेकर यांच्या "मांढरदेवी काळुबाईचा महिमा" या पुस्तकातून घेतली आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत.
सातारा जिल्ह्यातील वाई शहराच्या उत्तरेस सुमारे २२ कि.मी. अंतरावर मांढरदेवीचा डोंगर आहे. वाईच्या पश्चिमेस सह्याद्री पर्वताची रांग दक्षिणोत्तर पसरली असून या पर्वताच्या विस्तीर्ण पठारावर पांचगणी व महाबळेश्वर ही गिरिस्थानके वसलेली आहेत. या सह्याद्री पर्वतामधून पूर्व दिशेला एक डोंगररांग जाते. ही रांग रायरेश्वराच्या पठारापासून सुरु होऊन ती पूर्वेला शिखर शिंगणापूर येथे संपते. या डोंगररांगेला शंभू महादेवाचे डोंगर असे म्हणतात. या डोंगररांगेच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे तर उत्तरेला निरा नदीचे खोरे आहे. म्हणजे या दोन खो-यांमध्ये शंभू महादेवाचे डोंगर आहेत. या रांगेवर रायरेश्वराच्या शेजारी पूर्वेला केळंजा गड, वेरुळीचे पठार, त्यापुढे पांडवगड व त्यापुढे मांढरदेवीचा डोंगर आणि बालेघरचे पठार आहे. मांढरदेवीच्या डोंगराला मांदार पर्वत असेही म्हणतात. त्यावरुन गावाला मांदार-मांढर-मांढरदेव असे नाव पडले असावे.
पांडवांविषयी मतभेद : - मांढरदेवी येथील काळूबाई मंदिर नेमके केव्हा बांधले गेले याचा इतिहास उपलब्ध नाही. काहींच्या मते हे पांडवकालीन मंदिर असावे. तथापि याला इतिहास-संशोधकांची मान्यता नाही, कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते. वाई ही महाभारत काळात विराटनगरी होती व पांडव अज्ञातवासात इथे पांडवगडावर राहिले होते. या समजूतीला इतिहास तज्ञांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. वाई परिसरातील अनेक गोष्टींना जी साम्यदर्शक नावे दिलेली आहेत. उदा. पांडवगड, वैराटगड, भीमकुंड, किचक टेकडी इ. नावे पांडवाच्या गौरवार्थ दिली आहेत असे तज्ञांचे मत आहे.
पाटील यांचे स्वप्न :- काळूबाई मंदिराच्या उत्पत्तीविषयी काही आख्यायिका सांगितल्या जातात प्राचीनकाळी मांढरदेव गावाच्या पाटील घराण्यातील एका भाविकाला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. त्याप्रमाणे तो भाविक गावक-यांना घेऊन डोंगरमाथ्यावर गेला तेथील जमीन खोदली असता त्याला जमिनीत पुरलेली देवीची मूर्ती आढळली तिथेच तिची प्राणप्रतिष्ठा करुन मंदिर बांधले गेले अशी आख्यायिका सांगतात.
मांढव्य ॠषींची कथा :- मांढरदेवीच्या डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळी मांढव्य ॠषी तपस्या करीत होते. ते शिवभक्त होते परंतु त्यांना त्यांच्या या तपस्येत एक दैत्य त्रास देत होता या त्रासापासून मुक्तता व्हावी अशी त्या ॠषींनी शंकराकडे प्रार्थना केली. तेव्हा शंकराने महाकालीच्या द्वारे त्या दैत्याचा विनाश केला. म्हणून महाकालीच्या सन्मानार्थ डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधले गेले. मांढव्य ॠषींवरुन त्या देवीला मांढरदेवी आणि त्या गावाला मांढरदेव असे नाव दिले गेले. अशी दुसरी आख्यायिका गांवकरी सांगतात.
देवीलाख्य राक्षसाची वधकथा :-
श्रीमद् भगवद् गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात,
"यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मांन सृजाम्यहं ।
परित्राणाय साधुनाम विनाशाय दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे" ।
या देशात ज्या ज्या वेळी अर्धम माजेल त्या त्या वेळी दुष्टांचे
निर्दालन करुन सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी परमेश्वाराचा अवतार होतो.
श्री केदारविजय या ग्रंथात पुढील कथा वर्णन केली आहे. द्वारपारयुगाच्या शेवटी दक्षिण भारतात अनेक उन्मत्त राक्षस जनतेचा छळ करीत होते. राक्षसांचा राजा रत्नासूर याला ठार करण्यासाठी शंकराने केदारनाथाचे रुप घेतले. आदिमाया पार्वती आणि देवसेनेला घेऊन ते दक्षिणेकडे आले. देवसेनेचे सेनापती श्री भैरवनाथ या आपल्या रुपाकडे त्यांनी दिले. देवसेना आणि राक्षससेना यांच्यात तुंबळ युध्द झाले. त्यात भैरवनाथाने रत्नासूराचे बारा बलाढय राक्षस ठार मारले. खंदासूर, अवंदासूर, कुतादेलासूर, लवणासूर आदी राक्षसांचा नि:पात झाल्याने रत्नासूराने आपल्या महाबलाढय सेनापती देवीलाख्य राक्षस याला प्रचंड सेना व शस्त्रसामग्री देऊन युध्दावर पाठवले.
यापूर्वी देवीलाख्याने शंकराची तपश्चर्या करुन असे वरदान मागून घेतले होते की त्याला कोणाही देवाच्या वा मनुष्याच्या हातून मरण येणार नाही. तसेच त्याच्या अंगातून पडणा-या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर सूर्यकिरण पडले असता त्याच्यासारखे अनेक राक्षस तयार होतील. या वरदानामुळे देवीलाख्याला जणू अमरत्व मिळाले होते, त्यामुळे अत्यंत उन्मादाने लोकांचा छळ करीत असे.
देवीलाख्यसुराचा नि:पात करण्यासाठी केदारनाथांनी श्री कालरात्री देवी या पार्वतीच्या एका रुपाला पाठविले. स्त्री बरोबर युध्द करणे देवीलाख्य राक्षसाला अवघड नव्हते. सात दिवस तुंबळ युध्द झाले. पण देवीलाख्य मागे ह्टेना. त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर सूकिरण पडताच त्याच्यासारखे अनेक राक्षस निर्माण होत होते त्यामुळे कितीही राक्षस मारले तरी त्यांची संख्या कमी होत नव्ह्ती.
दरम्यान देवीलाख्याला मिळालेले वरदान व त्यामूळे राक्षसांच्या वाढत्या संख्येचे गुपीत कालरात्रीदेवीला शष्टाईने (सटवाईने) सांगितले. तिने रात्रीचे वेळी ठार करण्याचे ठरविले जेणेकरुन रात्र असल्यामुळे त्याच्या रक्तावर सूर्यकिरण पडणार नाही आणि त्यातून नवीन राक्षस निर्माण होणार नाहीत. देवीने पौष पोर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर व चंद्रोदय झाल्याबरोबर देवीलाख्य राक्षसाबरोबर पुन्हा लढाई करण्यास प्रारंभ केला. देवीने अक्राळविक्राळ रुप धारण केले. देवीलाख्याने सोडलेल्या शेकडो बाणांचा तिने चक्काचूर करुन टाकला. अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे तुंबळ युध्द झाले. अखेरीस बरोबर मध्यरात्री देवीने देवीलाख्यावर घाव घातला व वरच्यावर त्याचे रक्त पिऊन टाकले. आपले मरण जवळ आले आहे असे लक्षात येताच तो देवीला शरण आला आणि देवी जवळ असा वर मागितला की, “देवी तू थोर आहेस, मला तुझ्या चरणाजवळ निरंतर आश्रय दे आणि वर्षातून एकदा मनुष्याचे रक्त दे.” त्यावर देवी म्हणाली, “ तू माझ्य़ा चरणाजवळ आश्रय घे पण मानवी रक्त तूला मिळणार नाही. त्याएवजी अजापुत्र म्हणजेच बोकडाचे रक्त मिळेल.”
अशाप्रकारे या कथेनूसार दरवर्षी पौष पोर्णिमेस देवीची जत्रा साजरी केली जाते आणि जत्रेला आलेले लोक बोकडाचा बळी देण्याची प्रथा पाळतात. ज्यांना बोकड अर्पण करणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही ते कोंबडयाचा बळी देतात. बहुतेक वेळा देवीजवळ एखादे इच्छित कार्य पुरे होण्यासाठी पशुबळी देण्याचा नवस बोलला जातो आणि त्याप्रमाणे बळी देऊन नवस फेडला जातो.
देवीला मात्र तिखट नैवेद्य चालत नाही. तिला पुरणावरणाचा गोडाचा नैवेद्य लागतो. अशा या पौराणिक आणि दंतकथांवरुन आपणाला असा बोध घेता येईल की, जगामध्ये ज्या ज्या वेळी अन्याय आणि अत्याचार शिगेला पोहचतो, त्यावेळी या सृष्टीची उत्पत्ती आणि नियंत्रण करणारी अलौकिक शक्ती कोणत्यातरी रुपात प्रकट होते आणि दुर्जनांचा नाश करुन जगात शांतता प्रस्थापित करते.
मांढरदेवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे. तेथे मांढव्य ॠषींचे वास्तव्य होते. त्यामूळे मांढर या शब्दाची व्युत्पती ’मंदार’ किंवा ’मांढव्य’ या शब्दावरुन झाली असावी.
पुरातन काळात दक्षिण भारतात दानवांनी उच्छाद मांडला होता. तेव्हा आदिमाया पार्वतीने महाकालीच्या रुपात त्यांचा विनाश केला व मंदार पर्वतावर ती विश्रांतीसाठी आली आणि येथेच स्थानापन्न झाली. असे सांगतात.
मांढरदेवीच्या डोंगरावरील काळुबाईच्या मंदिरापेक्षा महादेवाचे हेमाडपंती मंदिर आधिक प्राचीन असावे. ते हेमाडपंती शैलीतील असल्याने मध्ययुगातील उत्तरार्धात देवगिरीच्या यादव सम्राट सिंघण याच्या काराकिर्दीत इ. स. १२१० ते १२४७ च्या दरम्यान ते बांधले असावे. मध्ययुगात सातारा-कोल्हापूर या भागावर पन्हाळा (कोल्हापूर) येथील शिलाहार या सम्राट चालुक्यांच्या सामंतांच्या घराण्यातील अखेरचा राजा दुसरा भोज याची सत्ता होती. या राजाने मांढरदेवी शेजारचा पांडवगड हा किल्ला बांधला. तसेच वाई परिसरातील केळंजागड, वैराटगड, चंदनवंदन हे किल्लेही बांधले. इ. स. १२०९ मध्ये सम्राट सिंघण ने या राजाचा पराभव करुन या भागावर यादवांची सत्ता प्रस्थापित केली. राजकीय व सांस्कृतिक एकात्मतेसाठी यादव राजांनी गावोगावी हेमाडपंथी पध्दतीची मंदिरे उभारली. यादवांच्या पदरी असलेल्या हेमाद्रीपंत याने विकसित केलेली हेमाडपंथी ही शिल्पशैली होय. विशिष्ट आकारचे दगड एकमेकांवर शास्त्रीय पध्दतीने बसवून मंदिरे उभारली जात. या बांधकामात चुन्याचा अगर लोखंडाचा वापर केला जात नाही हे त्याचे वैशिष्ट्य होय. गणितशास्त्रातील तुलासिध्दांतावर आधारीत अशी या हेमाडपंथी मंदिराची रचना असते. मात्र ऊन, वारा, पाऊस, धुके यामूळे या बांधकामातील एखादा दगड जर कुजून किंवा झिजून निखळला तर सर्व तोल बिघडून मंदिर भूईसपाट होते. कारण या बांधकामात दोन दगडांच्या मधे चुन्याचा वापर केला जात नसल्याने ते एकजीव होत नाही. अशी माहिती "महाराष्ट्र स्तोत्र-सह्याद्री" या पुस्तकात श्री. स. आ. जोगळेकर यांनी दिली आहे. महादेवाचे मंदिर देखिल पडलेले असावे. व अलीकडच्या काळात आजूबाजूला पडलेले दगड व खाणीतील चिरा घेऊन त्यांच्या भिंती बांधलेल्या दिसतात. या मंदिराला सध्या कळस नसून मंदिरावर असलेले सिमेंटचे छतही अलिकडेच घातल्या सारखे दिसते आहे.
सतीची चाल: महादेवाच्या मंदिराच्या आसपास सती गेलेल्या स्त्रियांची स्मारके आहेत. यावरुन या भागातही त्या काळी भयानक अशी सतीची चाल अस्तित्वात होती असे दिसते. पती निधनानंतर स्त्री सती गेल्याने तिची पती भक्ती सिध्द होते. ती विधवा म्हणून जगल्यास तिच्याहातून व्याभिचार होईल या शंकेने तिला सती जाण्याची सक्ती केली जात असे.
काळूबाई मंदिर : महादेवाच्या मंदीरानंतर काही शतकांनी काळूबाईचे मंदीर बांधले गेले असावे. शिवकालात म्हण्जे इसवीसन सतराव्या शतकाच्या मध्याला जी हेमाडपंथी मंदीरे बांधली गेली त्याच शैलीतील हे मंदिर आहे. पूर्वी हे मंदिर केवळ १० फूट लांब व ५ फूट रूंदीचा एक खण होता. सध्याच्या गाभा-यातील मधला खण म्हणजे हे मूळ मंदिर होय. या दगडी मंदिराला पूर्वी शिखर नव्ह्ते.
दिपमाळ : याच काळात मंदिरासमोर दिपमाळा उभारण्याची पध्दत रुढ होती. याही मंदिरासमोर १५ फूट उंचीच्या सतत तेवणा-या दोन दिपमाळा आहेत. यावरुन हे मंदिर इ. स. १६५० ते १६७० च्या दरम्यान बांधले असाचे असे वाटते. महाराष्ट्रातील शंकराच्या आणि खंडोबाच्या अनेक मंदिरासमोर दीपमाळा उभारलेल्या असतात. काळूबाई ही शंकराची पत्नी तसेअच स्कंदमाता म्हणजे खंडोबाची आई असल्याने तिच्याही मंदिरासमोर त्याकाळात दिपमाळा उभारल्या असाव्यात. खंडोबा हा शब्द स्कंद - स्कंदोबा - खंदोबा - खंडोबा अशा क्रमाने उत्पन्न झाला आहे.
गाभारा व शिखर : काळूबाईच्या मूळ मंदिराच्या दक्षिण व उत्तर बाजूला प्रत्येकी एक या प्रमाणे दोन खणाचे बांधकाम इ. स. १७५० च्या दरम्यान झाले असावे. मूळचा एक खण व नंतरचे दोन खण असे मिळून तीन खण म्हणजे मंदिराचा गाभारा होय. हा गाभारा १५ फूट लांब व १० फूट रुंद आहे. या गाभा।-यातील शिखराचे बांधकाम इ.स. १७५० साली करण्यात आले हे काम करीत असताना तेली बाबा या कारागिराचा शिखरावरुन पडून मृत्यु झाला. त्याची समाधी मंदिरानजिकच बांधली आहे.
फलकावरील लेख : मंदिराच्या पाय-यांवर एक फलक लावलेला असून त्यावरुन असे समजते कि, ४ फेब्रुवारी १८६२ च्या नोंदीवरुन देवीचे मूळ नाव ’काळेश्वरी’असे आहे. या देवस्थानला पन्नास एकर जमीन आहे. त्याची वहिवाट रावजी बीन सजनाजी गुरव यांच्याकडे होती. शेतीच्या उतपन्नातून ते देवीची पूजा-अर्चा करीत. आज त्यांचे वंशज परंपरेने देवीची पूजा-अर्चा करीतात.
सभागृहाचे बांधकाम : गाभा-यालगतचे मंदिराचे दगडी सभागृह इ. स. १९३५ साली बांधण्यात आले या सभागृहावर टी- अगल पध्दतीने छत घालण्य़ात आले. हे सभागृह २० फूट लांब व १५ फूट रुंद आहे. शिवशाहीर ब. मो. बाबासाहेब पुरंदरे यांचे मते काळूबाईचे मंदिर हे शिवकालाच्या पूर्वीही होते. छत्रपती शिवाजी महारांजाच्या कागदपत्रांमध्ये मांढरदेवच्या काळूबाई मंदिराचा उल्लेख आढळतो. त्यामूळे त्यांच्या या मताला पुष्टी मिळते.
आबांड खिंड : माढरदेवीकडे येताना घाटात कोचळेवाडीच्या अलिकडे आबांड खिंड लागते. शिवकालात या खिंडीत घोडरस्ता म्हणजे घोडे चालू शकतील असा रस्ता होता. अगदी अलिकडील काळापर्यंत वाईतील लोक ही आबांड खिंड उतरुन भोरला जात असत. इ. स. १८७१ ते १९१८ या काळात भोर संस्थानात पंतसचिव शंकरराव हे संस्थानिक होते. त्याची आजी तानुबाई ताईसाहेब सचिव यांच्यामनात मांढरदेव व वेरुळी हा भाग पांचगणी-महाबळेश्वर प्रमाणे गिरीस्थान म्हणून विकसीत करण्याचे सर्वप्रथम आले. तथापि त्यांच्याकडून हे काम पुर्ण होऊ शकले नाही.
विश्रांतिगृह व अन्नछत्र : ताईसाहेब सचिवांनी एकोणीसाव्या शतकात मध्यंतरी या खिंडीत वरच्या बाजूला एक विश्रांतिगृह बांधून त्याभोवती सुंदर बगिचा केला व पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून व्यव्स्था केली. आजूबाजूला वॄक्षांची लागवड करुन सावलीची सोय केली. भोर संस्थान खालसा होइपर्यंत येथे कायम अन्नछ्त्र चालविले जात होते. आबाड खिंड उतरणा-या पांथस्थांना येथे दोन घास खाऊन व पाणी पिऊन तृप्त मनाने आपली पूढील वाटचाल करता येत असे. त्याकाळी बांधलेले हे विश्रामगृह आजही चांगल्या स्थितीत आहे.
वेरुळीचे सोमेश्वर मंदिर : आंबाड खिंडीच्या पश्चिमेकडील डोंगरमाथ्यावर सोमेश्वरवाडी, वेरुळ, डुईचीवाडी अशी गावे आहेत. तेथे डोंगरावर विस्तीर्ण पठार दिसते. पश्चिमेस केदारेश्वर व दक्षिणेस सोमेश्वर ही प्राचीन शिवमंदिरे आवर्जून पाहण्य़ासारखी आहेत.
पाण्याचे पेव : वेरुळ येथील मातीत तांबे धातूचा अंश असल्याने पुर्वी ही माती घेऊन जात असत. त्याचे मोठे खड्डे म्हणजेच विहीरी या पठारावर जागोजागी पाण्याचे पेव दिसतात. पुर्वी वाईहून मांढरदेवीला येण्यासाठी बोपर्डी, धावडी, पिराचीवाडी, गुंडेवाडी या मार्गाने पायवाट होती. मांढरदेवीच्या पूर्वेस काही अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील खंबाटकी घाट आहे.
गिरीस्थानातील प्रयत्न : ब्रिटीशांनी सन १८२० च्या दरम्यान मांढरदेवी हे ठिकाण गिरीस्थान व सैनिकांचा तळ या दोन्ही हेतूंनी विकसित करण्याचा प्रयत्न केला. कारण या उंचावरच्या डोंगरपठारावरून शत्रूच्या हालचालीवर सर्व बाजूंनी ब-याच अंतरावर टेहाळणी करता येणे शक्य होते. त्यासाठी त्यांनी खंबाटकी घाटातून पश्चिमेकडे बालेघर मार्गे कच्चा रस्ता तयार केला. काही दिवस मांढरदेव गावानजिक सैनिकांच्या पलटणी आणून मोठा तल ठोकला. या भागात गो-यांच्या छावण्या उभारल्या गेल्या. मात्र त्यांनी येथील देवदेवतांना नावे ठेवली, गोरगरीब जनतेस दास बनवून त्यांची पिळवणूक केली.त्यांना येथे आपल्या वस्त्या वाढवायच्या होत्या. परंतु उन्हाळ्यात तेथे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले. सोसाट्याचे वादळ आणि काळ्याकुट्ट टपो-या व चाव-या भुंग्यांच्या झुंडीमूळे ब्रिटिश सैन्य वैतागून गेले. याल सुमारास महाबळेश्वर सारखे याहून विस्तीर्ण, आल्हाददायक हवामान व पिण्याच्या पाण्याची भरपूर सोय असलेले ठिकाण गवसल्याने ब्रिटीशांनी या भागात वस्ती करण्याचा प्रयत्न सोडुन दिला.
गावातील मंदिर : मांढरदेवी गावामध्ये माळावरचा मारुती आणि काळभैरवाचे मंदिर आहे. त्याची उभारणी गावक-यांनी याच शतकात केली असावी असे वाटते.
घाटाचे बांधकाम : वाई- मांढरदेवी हा घाट रस्ता वाई पंचायत समितीचे पहिले सभापती श्री. रामचंद्र ना. जाधव पाटील (गुळुंब) यांच्या प्रयत्नामूळे सन १९७० साली पक्क्या स्वरुपात बांधला गेला. भोर - मांढरदेवी हा घाट रस्ता १९९० च्या सुमारास तयार झाला. त्यामूळे वाईहून भोरला जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
मांढरदेवीची यात्रा : दरवर्षी शाकंबरी पोर्णिमेला या देवीची यात्रा भरते. पोर्णिमेच्या दिवशी ताजी यात्रा व दुसरे दिवशी शिळी जत्रा भरते. येथे यात्रेसाठी येणा-या भाविंकाचे प्रमाण फाइ मोठे म्हणजे लाखाच्या वर आहे. अनेक राज्यातून भाविक येत असतात. यात्रेला गर्दी होते म्हणून काही लोक यात्रे अगोदर अगर नतंर येतात. तशी ही यात्रा अनेक दिवस व महिने चालते. यात्रेच्या दिवशी म्हणजे पोर्णिमेला बारा वाजता मंदिराजवळ नागराज येतो. तो दिपमाळेस प्रदक्षिणा घालून मंदिराशेजारील पिंपरणी-चाफ्याच्या झाडावर जाऊन अदॄष्य होतो असे म्हणतात. फक्त भाग्यवान व्यक्तींनाच त्या नागराजाचे दर्शन होते अशी आख्यायिका या परिसरात सांगितली जाते.
यात्रा काळात मांढरदेव गावाचे संपूर्ण शिवार वाहनांनी व भक्तगणांनी भरुन गेलेले दिसते. अफाट गर्दीमूळे वाहनांना दूरवर थांबावे लागते व प्रवाशांना पायी चालत काही अंतर कापावे लागते. राज्य परिवहन महामंडळ येथे नियंत्रण कक्ष उभारुन जाणा-या येणा-या प्रवाशांची विभागवार सोय करुन देते.